10000 Rs Note India : भारताची चलन व्यवस्था अनेक वेळा बदलली गेली असून, काही निर्णय आजही लोकांच्या स्मरणात आहेत. यामधील एक धक्कादायक गोष्ट म्हणजे 10,000 रुपयांची नोट! होय, भारतात एकेकाळी 10,000 रुपयांची नोट वापरात होती आणि विशेष म्हणजे, ती दोन वेळा छापण्यात आली आणि दोन्ही वेळा सरकारने ती बंद केली. 10,000 रुपयांच्या नोटेची ही कहाणी भारताच्या आर्थिक इतिहासातील एक अनोखे पान आहे.
सर्वप्रथम 1938 मध्ये, जेव्हा भारत ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली होता, तेव्हा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने 10,000 रुपयांची नोट जारी केली होती. या नोटेचा वापर मुख्यतः व्यापारी, मोठे उद्योगपती आणि सरकारी व्यवहारांमध्ये होत असे. सामान्य माणसाला या नोटेची झलकही मिळणे अशक्य होते. त्या काळी 10,000 रुपये म्हणजे तब्बल 10 लाखांपेक्षाही अधिक किंमत होत होती.
1946 मध्ये, फसवणूक आणि काळ्या पैशाच्या वाढत्या वापरामुळे, ब्रिटिश सरकारने ही नोट बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर 1954 मध्ये, स्वातंत्र्यानंतर भारतात पुन्हा एकदा 10,000 रुपयांची नवीन डिझाईनसह नोट छापण्यात आली. यावेळी भारतीय ओळखीचे चिन्ह – अशोक स्तंभ – नोटेवर झळकले. परंतु बँकिंग आणि मोठ्या आर्थिक व्यवहारांपुरताच या नोटेचा वापर होऊ लागला. सामान्य माणसाला या नोटेचा काहीच उपयोग होत नव्हता.
1970 च्या दशकात काळ्या पैशाविरोधातील लढा अधिक तीव्र झाला. अखेर 1978 मध्ये, मोरारजी देसाई सरकारने एकाचवेळी 1,000, 5,000 आणि 10,000 रुपयांच्या नोटा बंद करण्याचा मोठा निर्णय घेतला. सरकारचे म्हणणे होते की या नोटा प्रामुख्याने काळ्या पैशाच्या साठवणुकीसाठी वापरल्या जात होत्या, आणि त्याचा सामान्य जनतेला काहीही उपयोग नव्हता.
या नोटा इतक्या दुर्मिळ होत्या की त्यांच्या बंदीचा सामान्य लोकांवर काहीच परिणाम झाला नाही. RBI च्या नोंदींनुसार, या नोटा चलनाच्या एकूण भागामध्ये नगण्य होत्या. आज त्या नोटा केवळ चलन संग्रहकर्त्यांच्या जवळ आहेत आणि त्यांच्या किंमती आत्ता लाखोंमध्ये जाऊ शकतात.
2016 मध्ये, नोटबंदीच्या निर्णयानंतर सरकारने 500 आणि 1,000 रुपयांच्या जुन्या नोटा बंद केल्या आणि त्याऐवजी नवीन डिझाईनसह 500 आणि 2,000 रुपयांच्या नोटा बाजारात आणल्या. परंतु 10,000 रुपयांच्या नोटेचा इतिहास कायमच भारतीय अर्थव्यस्थेतील एक गूढ अध्याय राहिला आहे.
🔴 हेही वाचा 👉 देशातील 7 कोटी EPFO धारकांसाठी मोठी बातमी! नवीन नियम लागू, PF मिळवण्यासाठी ‘ही’ अट अनिवार्य!.