11th Admission Process Maharashtra: अकरावी प्रवेश प्रक्रियेतील गोंधळ कायम; सुधारित वेळापत्रक उद्या होणार जाहीर

1 Min Read
11th Admission Process Maharashtra Schedule Update

11th Admission Process Maharashtra Schedule Update : राज्यभरातील विद्यार्थ्यांनी अकरावी प्रवेशासाठी वेबसाईटवर लॉगिन करताच वेबसाईट वर ‘बॅड गेटवे’चा संदेश दिसल्यामुळे नाराजीचा सूर उमटला आहे. वेबसाईट सुरळीत न चालल्याने विद्यार्थ्यांपासून पालकांपर्यंत सर्वांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

शिक्षण संचालनालयाने विद्यार्थ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करत गुरुवारी (२२ मे) दुपारी ३ वाजता सुधारित वेळापत्रक जाहीर करण्याचे पत्रक जारी केले आहे. यावर्षी दहावी उत्तीर्ण झालेल्या १३ लाखाहून अधिक विद्यार्थ्यांसाठी जवळपास २१ लाख प्रवेशजागा उपलब्ध असताना, प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्याच दिवशी आलेल्या अडचणींमुळे संपूर्ण यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

मुंबई, पुणे, नाशिक व छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका क्षेत्रांमध्ये ऑनलाईन पद्धतीने अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. परंतु, तांत्रिक बिघाडामुळे विद्यार्थ्यांना नोंदणी व प्राधान्यक्रम भरण्यास अडथळे येत असल्याचे स्पष्ट झाले. वेबसाईटवर तांत्रिक त्रुटी आल्यामुळे काही वेळासाठी पोर्टल बंद ठेवण्यात आले असून, त्यामध्ये सुधारणा करून वेळापत्रक पुन्हा प्रसिद्ध होणार आहे.

शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांना व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर वेळोवेळी अद्ययावत माहिती देण्याचे आश्वासन दिले असून, तांत्रिक त्रुटी दूर करण्यासाठी यंत्रणा कार्यरत असल्याचेही स्पष्ट केले असले तरी मदतीसाठी देण्यात आलेला हेल्पलाईन नंबर आणि ईमेल देखील प्रतिसाद देत नसल्याची काही पालकांची तक्रार आहे.

👉 विद्यार्थ्यांसाठी सुरु करण्यात आलेले व्हाट्सअप चॅनेल.

🔴 हेही वाचा 👉 अकरावी प्रवेश प्रक्रिया ठप्प: पोर्टल बंद, विद्यार्थ्यांमध्ये नाराजी; शिक्षण विभागाच्या व्यवस्थेवर सवाल.

Share This Article