Aadishakti Abhiyan Women Empowerment Maharashtra 2025 : राज्यातील महिलांच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्यविषयक समस्या सोडवण्यासाठी आणि त्यांचे सर्वांगीण सक्षमीकरण घडवून आणण्यासाठी महाराष्ट्र शासनाने २०२५-२६ पासून ‘आदिशक्ती अभियान’ (Aadishakti Abhiyan) राबविण्याला मान्यता दिली आहे. महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, या अभियानाच्या माध्यमातून शासनाच्या विविध महिलाभिमुख योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवण्यात येईल.
राज्यातील सुमारे ६० टक्के लोकसंख्या महिला व बालकांची असून, या अभियानाचा मुख्य उद्देश महिलांमध्ये जनजागृती, सक्षम सहभाग आणि योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करणे आहे. हे अभियान ग्रामस्तरापासून राज्यस्तरापर्यंत विविध समित्यांमार्फत राबवले जाणार असून, प्रत्येक ग्रामपंचायतीने त्यात सहभाग घेणे बंधनकारक आहे.
ग्रामस्तरीय सहभाग आणि पुरस्कार योजना
राज्यभरातील ग्रामपंचायतींमध्ये १५ दिवसांत विशेष ग्रामसभा घेऊन समित्या स्थापन केल्या जातील. हे अभियान प्रभावीपणे राबवणाऱ्या ग्रामपंचायतींना ‘आदिशक्ती पुरस्कार’ देण्यात येणार आहे.
अभियानाचे प्रमुख उद्दिष्ट आणि कार्यक्षेत्र
अभियानांतर्गत बालविवाह आणि हुंडा पद्धतीचे निर्मूलन, महिला संरक्षण, एकल महिला, विधवा व परित्यक्ता महिलांचे सक्षमीकरण, महिला बचत गटांचे निर्माण व प्रशिक्षण, कौशल्य विकास, कायदे व योजनांची जनजागृती, आरोग्य तपासणी, किशोरवयीन मुलींच्या शिक्षणात सातत्य, पर्यावरण संवर्धनासाठी वृक्ष लागवड आदी उपक्रम समाविष्ट आहेत.
समाजात संवेदनशीलता आणि चळवळ निर्माण करण्याचा प्रयत्न
या अभियानाच्या माध्यमातून समाजात महिलांच्या समस्यांबाबत संवेदनशीलता निर्माण करणे आणि महिलांच्या हक्कांसाठी चळवळ उभी करणे हा सरकारचा प्रयत्न आहे. आशा सेविका, आरोग्य सेविका, शालेय समित्या, पोषण व बालसंरक्षण समित्यांच्या माध्यमातून गावपातळीवर ठोस कार्यवाही केली जाणार आहे.
महिला व बाल विकास मंत्रालयाच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येणारे ‘आदिशक्ती अभियान’ हे राज्यातील महिलांसाठी एक व्यापक आणि परिवर्तन घडवून आणणारे पाऊल ठरणार आहे.
🔴 हेही वाचा 👉 ‘या’ कायद्याचे उल्लंघन केल्यास सरकारकडून तुमची जमीन होणार जप्त! जाणून घ्या संपूर्ण माहिती.