Aapale Sarkar : राज्यातील सर्व पालिकांमध्ये ‘आपले सरकार सेवा केंद्र’ सुरू होणार; नागरिकांना मिळणार विविध विभागांच्या ऑनलाइन सेवा

1 Min Read
Aapale Sarkar Seva Kendra Launch In Maharashtra Municipal Corporations

Aapale Sarkar Seva Kendra Launch In Maharashtra Municipal Corporations : राज्यातील महापालिका, नगरपरिषद आणि नगरपंचायतींमध्ये लवकरच ‘आपले सरकार सेवा केंद्र’ कार्यान्वित करण्यात येणार आहेत. नगर विकास विभागाने यासंदर्भातील अधिकृत आदेश जारी केला असून, आता ग्रामपंचायतांप्रमाणेच शहरी भागातही नागरिकांना शासकीय सेवा ऑनलाईन स्वरूपात मिळणार आहेत.

या केंद्रांद्वारे राज्य शासनाच्या विविध विभागांनी अधिसूचित केलेल्या सुमारे ७० ऑनलाईन सेवा नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यामध्ये रहिवासी प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, जातीचे दाखले, वयोमर्यादेचे दाखले, घरफाळा, पाणीपुरवठा, जन्म-मृत्यू प्रमाणपत्रे अशा अनेक सेवा समाविष्ट आहेत. यापूर्वी ही सेवा ग्रामपंचायती किंवा खासगी व्यक्तींमार्फत दिली जात होती.

राज्यातील सर्व महापालिकांचे आयुक्त, नगरपरिषद व नगरपंचायतींचे मुख्याधिकारी यांनी आपल्या क्षेत्रातील केंद्रांची यादी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करावी लागेल. यानंतर एनआयसी आणि महाआयटी महामंडळाकडून ‘युजर आयडी’ आणि ‘वॉलेट’ सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे, जेणेकरून ऑनलाइन अर्जाचे शुल्कही स्वीकारले जाऊ शकेल.

ही केंद्रे सुरु केल्याने नागरिकांना त्यांच्या शहरातच संगणकीकृत पद्धतीने शासकीय सेवा मिळतील, यामुळे वेळ, पैसा आणि त्रास वाचेल. राज्यसेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्त आणि उपमुख्यमंत्र्यांनीही यासाठी पाठपुरावा केला होता. परिणामी, आता संपूर्ण महाराष्ट्रात ‘आपले सरकार सेवा केंद्र’ शहरी भागात सुरू होणार आहेत.

🔴 हेही वाचा 👉 महाराष्ट्र बोर्ड 10वीचा निकाल तपासा mahresult.nic.in वर.

Share This Article