Agriculture News: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी: शेतरस्ते आता किमान ३ ते ४ मीटर रुंद होणार – महसूल विभागाचा मोठा निर्णय

2 Min Read
Big news for farmers in Maharashtra Farm roads will now be at least 3 to 4 meters wide

Maharashtra Agriculture News : शेतीमध्ये वाढत्या यांत्रिकीकरणाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. महसूल विभागाने महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ च्या कलम १४३ नुसार शेतरस्ते आता किमान ३ ते ४ मीटर रुंद असावेत, असा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

पारंपरिक अरुंद पायवाटा आणि बैलगाडीच्या वाटा आता ट्रॅक्टर, रोटाव्हेटर, हार्वेस्टर यांसारख्या अवजड शेती अवजारांसाठी अपुऱ्या पडत होत्या. त्यामुळे कृषीमालाची वाहतूक अडथळ्यांमुळे उशिराने होत होती. ही अडचण लक्षात घेऊन महसूल विभागाने शेतरस्त्यांचे नियोजन नव्याने करण्याचे निर्देश दिले आहेत.

यापुढे शेतकरी जेव्हा शेतरस्त्यासाठी अर्ज करतील, तेव्हा स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन योग्य त्या रुंदीचा रस्ता मंजूर केला जाणार आहे. जर ३ ते ४ मीटर रुंद रस्ता शक्य नसेल, तर किमान शक्य तितक्या जास्त रुंदीचा पर्यायी मार्ग देण्याचे आदेश आहेत.

बांधावरून रस्ते देताना त्याचे नैसर्गिक स्वरूप कायम ठेवण्याचे निर्देशही शासनाने दिले आहेत. त्याचप्रमाणे भविष्यात सीमाविवाद होऊ नये म्हणून दोन्ही बाजूंच्या जमिनींची स्पष्ट नोंद घेण्यावरही भर दिला जात आहे.

हा निर्णय शेतकऱ्यांना आधुनिक शेती उपकरणांचा लाभ घेण्यासाठी आणि कृषीमालाचा जलद व सुरक्षित वाहतूक सुलभ करण्यासाठी एक मोठे पाऊल ठरणार आहे. राज्यभरातील शेतकरी या निर्णयाचे स्वागत करत असून, या निर्णयामुळे ग्रामीण शेती व्यवस्थेतील मूलभूत सुविधा अधिक सक्षम होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

🔴 हेही वाचा 👉 दहा हजार रुपयांच्या नोटा छापल्या गेल्या आणि बंदही झाल्या! जाणून घ्या अजब कहाणी.

Share This Article