नवी दिल्ली | २७ मे २०२५ : Incom Tax Return Deadline Extended September 2025 — करदात्यांसाठी एक दिलासा देणारी बातमी आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ (CBDT) ने २०२५–२६ या मूल्यांकन वर्षासाठी आयकर विवरणपत्र (ITR) भरण्याची अंतिम मुदत ३१ जुलैऐवजी आता १५ सप्टेंबर २०२५ पर्यंत वाढवली आहे. या मुदतवाढीमागे सरकारचे उद्दिष्ट हे नव्याने सुधारित ITR फॉर्म्सच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक तांत्रिक वेळ मिळवणे हे आहे.
CBDT ने दिलेल्या निवेदनात स्पष्ट केल आहे की यावर्षीच्या आयटीआर फॉर्म्समध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा करण्यात आल्या आहेत. या सुधारणा कर अनुपालन सुलभ करणे, अधिक पारदर्शकता निर्माण करणे आणि अचूक माहिती सादर करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहेत. याच पार्श्वभूमीवर सरकारला ई-फायलिंग प्रणालीच्या विकास, संकलन आणि चाचणीसाठी अतिरिक्त वेळ हवा असल्याने मुदतवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे.
या वर्षीच्या फॉर्ममध्ये नवीन कायद्यानुसार अधिक माहिती मागवली जात आहे. उदाहरणार्थ, कर कपातीसाठी दिल्या जाणाऱ्या सुटीची सविस्तर माहिती, टीडीएस कोड्सचा तपशील, तसेच २३ जुलै २०२४ पूर्वी आणि नंतर झालेल्या भांडवली नफ्याचे वर्गीकरण या नव्या अपेक्षा आहेत. वित्त अधिनियम २०२४ नुसार झालेल्या बदलांचा या फॉर्म्सवर परिणाम झाला आहे आणि त्यामुळे करदात्यांना योग्य माहिती सादर करण्यासाठी अधिक वेळ देण आवश्यक होत.
CBDT ने हेही स्पष्ट केल आहे की ३१ मेपर्यंत प्राप्त होणाऱ्या टीडीएस स्टेटमेंट्सचे क्रेडिट जूनच्या सुरुवातीसच उपलब्ध होईल. त्यामुळे मूळ अंतिम मुदतीपर्यंत रिटर्न भरण्याची वास्तविक मुदत खूपच कमी राहिली असती. त्यामुळे या मुदतवाढीमुळे करदात्यांना रिटर्न फायलिंगसाठी पुरेसा वेळ मिळणार आहे.
या मुदतवाढीमुळे कर सल्लागार, करदाता आणि इतर संबंधित यंत्रणा नव्या प्रणालींशी सुसंगतपणे काम करू शकतील, आणि कोणताही तांत्रिक अडथळा न येता प्रक्रिया सुरळीत पार पडेल. CBDT लवकरच यासंदर्भातील अधिकृत अधिसूचना जारी करणार आहे.
🔴 हेही वाचा 👉 पोस्ट ऑफिसमध्ये दरमहा ₹2000, ₹3000 किंवा ₹5000 गुंतवले तर ५ वर्षांने किती परतावा मिळेल?.