शेतीच्या वाटणीसाठी आता लागणार केवळ ५०० रुपये; महसूल विभागाचा मोठा निर्णय Maharashtra Farmer News

2 Min Read
Maharashtra Farmer Land Partition Registration Fee Reduced

Maharashtra Farmer Land Partition Registration Fee Reduced : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी दिलासादायक बातमी आहे. आता शेतीच्या वाटणीपत्राची नोंदणी फक्त ५०० रुपयांमध्ये करता येणार आहे. महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागाने घेतलेल्या या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे यापुढे वाटणीपत्रासाठी लागणाऱ्या नोंदणी शुल्कातून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. विशेष म्हणजे, शेतजमिनीचे वाटप करताना आतापर्यंत लागणारे नोंदणी शुल्क हे अनेक वेळा मुद्रांक शुल्कापेक्षाही अधिक होते. त्यामुळे अनेक शेतकरी वाटपाचे दस्त नोंदणी न करता ठेवत होते आणि भविष्यात जमिनीच्या हिश्श्यांवरून वाद उद्भवत होते.

महाराष्ट्र जमीन महसूल कायद्यानुसार, शेतीच्या वाटणीसाठी मोजणी करून वाटपाचे दस्त तयार करावे लागतात आणि त्यावर मुद्रांक शुल्क व नोंदणी शुल्क भरावे लागते. जरी मुद्रांक शुल्क केवळ १०० रुपये असले तरी नोंदणी शुल्क काही प्रमाणात अधिक होते. विशेषतः ज्यांच्या वाटणीमध्ये कमी मूल्याच्या जमिनी येतात, त्यांच्यासाठीही ही नोंदणी फी कधी कधी जास्तीची ठरत असे. यामुळेच अनेक शेतकरी वाटपाचे दस्त रजिस्टर करत नव्हते.

या पार्श्वभूमीवर महसूल विभागाने घेतलेल्या नवीन निर्णयामुळे आता शेती वाटणीसाठी लागणारे नोंदणी शुल्क फक्त ५०० रुपये इतके निश्चित करण्यात आले आहे. या निर्णयामुळे सरकारच्या महसुलात दरवर्षी ३५ ते ४० कोटी रुपयांची घट होण्याची शक्यता आहे, मात्र शेतकऱ्यांना भविष्यातील जमिनीच्या वादांपासून मुक्त ठेवण्यासाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा असल्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी स्पष्ट केले आहे.

या निर्णयामुळे शेतकऱ्यांना कायदेशीर वाटप दस्त नोंदवता येईल, तसेच जमिनीच्या मालकी हक्काचे दस्तऐवजीकरण अधिक पारदर्शक व विश्वासार्ह होणार आहे. यामुळे भावंडांमधील जमिनीच्या वाटणीसंबंधी होणाऱ्या वादांना आळा बसेल आणि शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसानही टळेल. महाराष्ट्र शासनाचा हा निर्णय शेतकरीहिताच्या दृष्टीने अत्यंत स्तुत्य मानला जात आहे.

🔴 हेही वाचा 👉 ‘या’ भूमिहीन शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी: 100 टक्के अनुदानावर मिळतेय जमीन, जाणून घ्या काय आहे योजना.

Share This Article