Maharashtra Kanyadan Yojana 2025: कन्यादान योजनेत मोठा बदल; अनुदानाच्या रकमेत वाढ

1 Min Read
Maharashtra Kanyadan Yojana 2025 Update

Maharashtra Kanyadan Yojana 2025 Update : महाराष्ट्र सरकारने कन्यादान योजनेत मोठा बदल केला असून, योजनेच्या अर्थसहाय्याच्या रकमेत तब्बल २५ टक्क्यांची वाढ जाहीर केली आहे. यानुसार, आता या जोडप्यांना प्रत्येकी २५,००० रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. समाजकल्याण विभागाच्या कन्यादान योजनेत करण्यात आलेल्या या बदलामुळे, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील नवविवाहित दाम्पत्यांना थेट मदत मिळणार आहे.

सन 2003-04 पासून लागू असलेल्या या योजनेत, अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, व विशेष मागास प्रवर्गातील कुटुंबांतील सामुहिक विवाह करणाऱ्या जोडप्यांना सुरुवातीला १०,००० रुपयांचे अर्थसहाय्य दिले जात होते. यात ६,००० रुपये मंगळसूत्रासाठी आणि ४,००० रुपये संसारोपयोगी वस्तूंसाठी देण्यात येत होते.

नंतर २०१६ मध्ये ही रक्कम वाढवून २०,००० रुपये करण्यात आली होती. मात्र आता, महिला व बालविकास विभागाच्या ‘शुभमंगल’ योजनेच्या धर्तीवर एकसंधता राखण्यासाठी, कन्यादान योजनेच्या अनुदानाची रक्कम २५,००० रुपये करण्यात आली आहे. तर स्वयंसेवी संस्थांना मिळणारे ४,००० रुपयांचे अनुदान मात्र पूर्ववतच ठेवण्यात आले आहे.

हा निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने घेतला असून, तो राज्यातील सामुहिक विवाह कार्यक्रमांमध्ये पारदर्शकता, एकरूपता आणि आर्थिक मदतीत वाढ या उद्दिष्टांनी प्रेरित आहे. त्यामुळे योजनेचा लाभ अधिक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याची शक्यता असून, गरजू नवविवाहित जोडप्यांना त्यांच्या वैवाहिक आयुष्याच्या प्रारंभाला आर्थिक मदत मिळेल.

हेही वाचा : ३० जूनपासून UPI व्यवहारांमध्ये मोठा बदल; NPCI चे दोन नवे नियम लागू.

Share This Article