Maharashtra Government News : राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र सरकारने शेतजमिनीच्या हिस्सेवाटप मोजणीसाठी आकारले जाणारे शुल्क मोठ्या प्रमाणात कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता फक्त २०० रुपयांमध्ये शेतजमिनीचे मोजणी व हिस्सेवाटप करण्यात येणार असल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी दिली आहे.
यापूर्वी जमिनीच्या हिस्सेवाटपासाठी प्रति हिस्सा १००० ते ४००० रुपयांपर्यंत शुल्क आकारले जात होते. मात्र, अनेक वर्षांपासून शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक यावर नाराजी व्यक्त करत होते. अखेर राज्य सरकारने शेतकऱ्यांवरील आर्थिक भार कमी करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.
महसूलमंत्री बावनकुळे यांनी सांगितले की, आता फक्त २०० रुपये मोजणी शुल्क भरून, नोंदणीकृत वाटणीपत्र आणि अधिकृत नकाशे संबंधित नागरिकांना मिळणार आहेत. सरकारचा उद्देश जमिनीच्या वाटप प्रक्रियेला सुलभ, पारदर्शक आणि परवडणारी बनवण्याचा आहे.
राज्यातील संयुक्त कुटुंबातील जमिनींच्या वाटपासंदर्भात अनेक वाद निर्माण होत होते. अशा परिस्थितीत, ही नवी सुविधा शेतकऱ्यांना वेळ आणि पैशांची बचत करून देणार आहे, असे महसूल विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
महसूल विभागाच्या या निर्णयामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून, शेतजमिनीच्या मोजणी प्रक्रियेतील अडथळे दूर होणार आहेत. सरकारच्या या पावलाचे शेतकरी संघटनांनी आणि ग्रामस्थांनी स्वागत केले आहे.
🔴 हेही वाचा 👉 महाराष्ट्रात कार खरेदीसाठी नवीन नियम लागू.