महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रीय? हवामान खात्याचा अंदाज, शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा Maharashtra Monsoon Resume June 2025

2 Min Read
Maharashtra Monsoon Resume June 2025

Maharashtra Monsoon Resume June 2025 : महाराष्ट्रात जून महिन्याच्या सुरुवातीलाच जोरदार पावसाने आगमन केले असले, तरी मागील काही दिवसांपासून मान्सूनने उघडीप दिली आहे. २६ मे रोजी मुंबईत मान्सूनचा प्रवेश झाला आणि पहिल्याच दिवशी अनेक भागांत पावसाने जोरदार हजेरी लावली होती. मात्र त्यानंतर हवामान स्थिर राहिल्यामुळे राज्यभरात पुन्हा एकदा मान्सून कधी सक्रीय होणार, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहे. याच पार्श्वभूमीवर हवामान विभागाने (IMD Weather Report) महत्त्वाची माहिती दिली आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार, ९ जून रोजी कोकण विभागात तुरळक स्वरूपात पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यानंतर १० ते १२ जून दरम्यान राज्यातील बहुतांश भागांत पावसाचा जोर कमी राहण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मात्र, १३ जूनपासून मृग नक्षत्राचा प्रारंभ होत असून त्याच दिवशी मान्सून पुन्हा सक्रीय होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

दरम्यान, १४ जूनपर्यंत पश्चिम किनारपट्टी वगळता राज्यातील अनेक भागांमध्ये तापमान वाढण्याचा इशारा देण्यात आला आहे. विशेषतः विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशातील जिल्ह्यांमध्ये तापमानात मोठी वाढ होण्याची शक्यता असून, पूर्व विदर्भात कमाल तापमान ४५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. इतर भागांमध्येही तापमान ४० अंशांच्या पुढे जाण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यामुळे नागरिकांनी उष्णतेपासून बचावासाठी आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे आहे.

मान्सूनचा वेग काही भागांत मंदावल्याने अद्याप खानदेश, उत्तर नाशिक आणि विदर्भाचा काही भाग पावसापासून वंचित राहिला आहे. अनुकूल हवामान परिस्थिती अद्याप तयार न झाल्याने मान्सूनने या भागांत प्रवेश केला नाही. हवामान शास्त्रज्ञांच्या मते, लवकरच हवामानातील बदलामुळे या भागांमध्येही मान्सून सक्रिय होईल.

दरम्यान, बुलढाणा, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ आणि गडचिरोली या जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने अलर्ट जारी केला आहे. या भागांत विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता असल्यामुळे स्थानिक प्रशासनाने खबरदारी घेण्याचे निर्देश दिले आहेत. याशिवाय, कृषी विभागाकडून राज्यभरातील शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आले आहे की, सार्वत्रिक पाऊस स्थिर होईपर्यंत पेरणी व लागवडीची घाई करू नये. विशेषतः कोरडवाहू शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी हवामान खात्याच्या सूचनांचे पालन करणे अत्यंत आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे.

हेही वाचा : एकदाच गुंतवणूक करा आणि मिळवा दरमहा 12000 रुपये आजीवन पेन्शन; सर्व वयोगटासाठी नागरिकांसाठी.

Share This Article