Mhada Housing Price Reduction 2025 : घर खरेदी करणाऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. म्हाडाने प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) (PM Awas Yojana) अंतर्गत अत्यल्प उत्पन्न गटातील शिरढोण आणि खोणी येथील ६२४८ सदनिकांची विक्री किंमत घटवली असून प्रत्येक सदनिकेच्या किमतीत १ लाख ते १.५ लाख रुपयांपर्यंत कपात करण्यात आली आहे.
कोकण मंडळाच्या ऑक्टोबर २०२४ मध्ये ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ तत्वावर जाहीर करण्यात आलेल्या लॉटरीमध्ये ठाणे जिल्ह्यातील शिरढोण येथे ५२३६ सदनिकांचा समावेश होता. म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी या सदनिकांच्या सुधारित विक्री किंमतीच्या प्रस्तावाला मान्यता दिली असून या निर्णयानुसार प्रत्येकी सदनिकेची किंमत तब्बल १,४३,४०४ रुपयांनी घटवण्यात आली आहे. सुधारित विक्री किंमत आता १९,२८,७४२ रुपये इतकी आहे.
त्याच योजनेत खोणी येथील १०१२ अत्यल्प उत्पन्न गटातील सदनिकांचाही समावेश आहे. या घरांच्या किंमतीत प्रत्येकी १,०१,८०० रुपयांची कपात करण्यात आली असून आता त्या सदनिकांची विक्री किंमत १९,११,७०० रुपये इतकी झाली आहे.
हा निर्णय परवडणाऱ्या घरांच्या उपलब्धतेकडे मोठ पाऊल मानले जात असून मध्यमवर्गीय आणि अत्यल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी घर खरेदी करणे आता आणखी सोपे झाले आहे. म्हाडाच्या या निर्णयामुळे आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकांना अधिक लाभ मिळणार असून घर खरेदीसाठीची उत्तम संधी उपलब्ध होणार आहे.
🔴 हेही वाचा 👉 महावितरणच्या नावाने बनावट भरती संकेतस्थळ; नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन.