मुंबई | २५ मे २०२५: Maharashtra Weather News – यंदा मान्सूनने झपाट्याने वाटचाल सुरू केली असून महाराष्ट्रात वेळेपेक्षा तब्बल १२ दिवस आधी म्हणजेच २५ मे रोजी मान्सूनने प्रवेश केला आहे. भारतीय हवामान खात्याच्या (IMD) माहितीनुसार, पुढील तीन दिवसांत मान्सून मुंबईसह कोकण किनारपट्टीवर पोहोचेल, अशी शक्यता आहे.
सामान्यतः मान्सून ७ जूनला महाराष्ट्रात आणि ११ जूनदरम्यान मुंबईत दाखल होतो. मात्र यंदा त्याचा वेग अधिक असून, आधीच अनेक भागांत मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात झाली आहे.
मान्सूनची सध्याची स्थिती
हवामान विभागाच्या माहितीनुसार, मान्सूनने केरळ, कर्नाटक, गोवा, महाराष्ट्राच्या काही भागांत, तसेच ईशान्य भारतात नागालँड, मिझोराम आणि मणिपूरच्या काही भागांमध्येही प्रवेश केला आहे. महाराष्ट्रात कोकण, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, तसेच काही मध्यवर्ती भागांतही पावसाचे आगमन झाले आहे.
मुंबईत जोरदार पावसाची शक्यता
मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून मान्सूनपूर्व सरी कोसळत आहेत. हवामान विभागाने पुढील ४८ ते ७२ तासांत मुंबईत जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी, असा सल्ला हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
इतिहासातील सर्वात लवकर दाखल झालेला मान्सून?
यंदा मान्सून आगमनाचा वेग लक्षणीय आहे. २००९ नंतर प्रथमच २४ मे रोजी केरळमध्ये मान्सून दाखल झाला. याआधी १९१८ मध्ये सर्वात लवकर म्हणजे ११ मे रोजी मान्सून आला होता. मागील वर्षी ३० मे रोजी केरळमध्ये मान्सून दाखल झाला होता.
अल निनोचा प्रभाव नाही
एप्रिलमध्ये हवामान खात्याने अंदाज वर्तवला होता की २०२५ मध्ये मान्सूनसाठी अनुकूल परिस्थिती राहणार आहे. यामध्ये ‘अल निनो’ चा प्रभाव फारसा जाणवणार नसल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. त्यामुळे महाराष्ट्रासह देशभरात समाधानकारक पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
मान्सूनचा देशभरातील प्रवास
सामान्यतः १ जूनला केरळमध्ये प्रवेश केल्यानंतर, ८ जुलैपर्यंत मान्सून संपूर्ण देश व्यापतो. यानंतर १७ सप्टेंबरपासून उत्तर भारतातून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होतो आणि १५ ऑक्टोबरपर्यंत मान्सून पूर्णपणे मागे सरतो.
हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, मान्सून लवकर येणे आणि संपूर्ण हंगामातील पावसाचे प्रमाण यामध्ये थेट संबंध नसतो.
🔴 हेही वाचा 👉 “योजनेचा खर्च एवढा…. तरीही बंद होणार नाही ही योजना “ – छगन भुजबळ.