UPI New Rules India June 2025 Changes : देशातील कोट्यवधी युपीआय (UPI) वापरकर्त्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने युपीआय व्यवहार अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि विश्वासार्ह बनवण्यासाठी दोन नवे नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. हे बदल ३० जून २०२५ पासून टप्प्याटप्प्याने अंमलात येणार असून, डिजिटल व्यवहार करताना याचा थेट परिणाम वापरकर्त्यांवर होणार आहे.
युपीआयवर व्यवहार करताना आतापर्यंत आपण ज्याला पैसे पाठवत होतो त्यांचे टोपणनाव किंवा फोनमध्ये सेव्ह केलेले नाव दिसत होते. मात्र, ३० जूनपासून हे बदलले जाणार असून, यानंतर केवळ बँकेत नोंदणीकृत अधिकृत नावच वापरकर्त्याला दिसणार आहे. NPCI ने स्पष्ट केल आहे की या बदलामुळे QR कोडद्वारे होणाऱ्या फसवणुकीस आळा बसेल आणि बनावट नावे वापरणाऱ्यांना रोखता येईल. त्यामुळे पेमेंट करताना वापरकर्ता फसवणुकीपासून अधिक सुरक्षित राहील.
दुसरा मोठा बदल १ ऑगस्ट २०२५ पासून अंमलात येणार आहे. यानुसार, युपीआय वापरकर्ते दिवसातून फक्त ५० वेळा बॅलन्स तपासू शकतील. NPCI च्या मते, वारंवार बॅलन्स तपासल्यामुळे सर्व्हरवर अनावश्यक ताण निर्माण होतो, ज्यामुळे संपूर्ण सिस्टिम मंदावते. त्यामुळे या मर्यादेचा उपयोग प्रणालीच्या कार्यक्षमतेत वाढ करण्यासाठी केला जाणार आहे. PhonePe, Google Pay, Paytm यांसारख्या लोकप्रिय UPI अॅप्सवर हे नियम लागू होतील.
याचबरोबर, ऑटोपे सुविधांनाही मर्यादा घालण्यात येणार असून, SIP, OTT सबस्क्रिप्शन यांसारख्या सेवा केवळ नॉन-पीक अवर्समध्येच प्रक्रिया करता येतील. म्हणजे सकाळी १० ते दुपारी १ आणि संध्याकाळी ५ ते रात्री ९.३० या वेळेतच ऑटोपेचे व्यवहार पूर्ण होतील. त्याचबरोबर, बँका आता युपीआय व्यवहारानंतर ग्राहकांना थेट बॅलन्सची माहिती पाठवतील, जेणेकरून वापरकर्त्यांना वारंवार बॅलन्स तपासण्याची गरज भासणार नाही.
NPCI ने सर्व बँकांना आणि पेमेंट सेवा प्रदात्यांना (PSP) या नव्या नियमांचे पालन अनिवार्य केले असून, ३० ऑगस्ट २०२५ पर्यंत त्यांना यासंदर्भात हमीपत्र NPCI ला सादर करणे आवश्यक आहे. नियम मोडणाऱ्यांवर दंड, API ब्लॉकिंग किंवा नवीन ग्राहकांचे ऑनबोर्डिंग थांबवण्यासारख्या कठोर कारवायांची शक्यता असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
हेही वाचा : जमीन नोंदणी प्रक्रियेत मोठा बदल; जाणून घ्या नवीन नियम.