Mahavitaran Fake Job: महावितरणच्या नावाने बनावट भरती संकेतस्थळ; नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन

1 Min Read
Mahavitaran Fake Job Website Alert

मुंबई, २३ मे | Mahavitaran Fake Job Website Alert : महावितरणच्या नावाने बनावट संकेतस्थळ तयार करून ४,३०० पदांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या फसवणुकीच्या प्रकारावर महावितरणने कठोर भूमिका घेत सायबर गुन्हे विभागाकडे तक्रार दाखल केली आहे, तसेच नागरिकांना अशा फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे.

www.mahavitaranmaharashtra.com‘ या बनावट संकेतस्थळावर शिपाई, वॉचमन, वाहतूक कामगार व साफसफाई कामगार आदी पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. ही भरती ‘महावितरण महाराष्ट्र – अधिकृत सेवा’ या नावाखाली दाखवण्यात आली असून, अर्ज प्रक्रियेसाठी गुगल फॉर्मचा वापर करण्यात आला आहे. सातवी आणि दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी ही संधी असल्याचे भासवून, मागासवर्गीय उमेदवारांकडून ₹८०० आणि सर्वसामान्य प्रवर्गातील उमेदवारांकडून ₹९०० चे शुल्क UPI QR कोडद्वारे भरण्याची मागणी केली जात आहे.

महावितरणने स्पष्ट केले आहे की या भरतीसाठी कोणतीही अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आलेली नाही आणि कोणत्याही स्वरूपात पैसे भरण्याची मागणी महावितरणतर्फे करण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांनी अशा बनावट जाहिरातींना बळी पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

या संदर्भात नागरिकांनी अधिकृत वेबसाइट www.mahadiscom.in वरूनच महावितरणच्या भरती संदर्भातील माहिती पडताळून पाहावी, अशी सूचनाही देण्यात आली आहे.

🔴 हेही वाचा 👉 ‘या’ तारखेपूर्वी ‘आधार कार्ड’ मोफत अपडेट करा; जाणून घ्या ऑनलाइन प्रक्रिया.

Share This Article