Atal Pension Yojana Benefits 2025 : मोदी सरकारची ‘अटल पेन्शन योजना’ (Atal Pension Yojana) आज देशातील नागरिकांसाठी वृद्धापकाळातील आधारस्तंभ ठरत आहे. पेन्शन फंड रेग्युलेटरी आणि डेव्हलपमेंट प्राधिकरण (PFRDA) नुसार, 31 मार्च 2025 पर्यंत देशातील 7.60 कोटींहून अधिक नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.
10 वर्षातच अटल पेन्शन योजनेने ही कामगिरी केली असून, यामध्ये 2024-25 या एकाच आर्थिक वर्षात 1.17 कोटी नवीन खातेधारक जोडले गेले आहेत. मागील तीन वर्षांपासून दरवर्षी 1 कोटीहून अधिक लोक या योजनेचा लाभ घेत आहेत.
44,780 कोटींचा गुंतवणूक निधी
अटल पेन्शन योजनेअंतर्गत नागरिकांनी एकूण 44,780 कोटी रुपयांहून अधिक रक्कम गुंतवली आहे. त्याचबरोबर या योजनेतून लाभार्थ्यांना सरासरी 9.11% वार्षिक परतावा मिळाला आहे. विशेष म्हणजे, 2024-25 मध्ये 55% नवीन खातेदार महिला आहेत, ही बाब महिला सक्षमीकरणाच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण आहे.
‘अटल पेन्शन योजना’ काय आहे?
18 ते 40 वर्षे वयोगटातील कोणतीही व्यक्ती या योजनेत सहभागी होऊ शकते.
कमीत कमी 20 वर्षे योगदान केल्यास निवृत्तीनंतर दरमहा पेन्शन मिळते.
निवृत्तीनंतर दरमहा ₹1,000 ते ₹5,000 पर्यंतची पेन्शन मिळते.
उदाहरणार्थ, जर एखाद्या व्यक्तीने या योजनेत वयाच्या 18 व्या वर्षी रोज फक्त 7 रुपये म्हणजेच मासिक 210 रुपये गुंतवले, तर वयाच्या 60 वर्षांनंतर त्याला 5,000 रुपये पेन्शन मिळू शकते.
मृत्यूनंतर पती/पत्नीस पेन्शन मिळते; दोघांचेही निधन झाल्यास त्यांच्या नॉमिनीला संपूर्ण रक्कम परत दिली जाते.
कर सवलती व अटी
या योजनेअंतर्गत गुंतवणुकीवर आयकर अधिनियमाच्या 80C अंतर्गत ₹1.5 लाखांपर्यंत टॅक्स सवलत मिळते.
1 ऑक्टोबर 2022 पासून, आयकरदाता (Taxpayer) असलेली व्यक्ती या योजनेस पात्र नाही.
अर्जदाराकडे बँक खाते (आधार लिंक असलेले) आणि वैध मोबाइल नंबर असणे आवश्यक आहे.
हेही वाचा : महिलांसाठी खास योजना! मिळणार 5 लाखांचे बिनव्याजी कर्ज.