Atal Pension Yojana Benefits Eligibility Marathi : देशातील असंघटित क्षेत्रातील कामगार, शेतकरी, छोटे व्यावसायिक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी वृद्धावस्थेतील आर्थिक सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी केंद्र सरकारकडून अटल पेन्शन योजना राबवली जाते. ही योजना विशेषतः अशा नागरिकांसाठी आहे, ज्यांना निवृत्तीनंतर कोणतेही निश्चित उत्पन्नाचे साधन उपलब्ध नसते. त्यामुळे भविष्यातील आर्थिक गरजा भागवण्यासाठी आणि स्वाभिमानाने जगण्यासाठी ही योजना महत्त्वपूर्ण ठरते.
अटल पेन्शन योजनेत सहभागी होण्यासाठी नागरिकाचे वय किमान १८ आणि कमाल ४० वर्षे असणे आवश्यक आहे. या योजनेत अर्जदाराने दरमहा ठराविक रक्कम गुंतवणूक केल्यास ६० वर्षांचे निवृत्ती वय झाल्यानंतर दरमहा एक हजार ते पाच हजार रुपयांपर्यंतची पेन्शन मिळू शकते. पेन्शनची रक्कम अर्ज करताना अर्जदाराने निवडावी लागते आणि त्यानुसारच त्याचे मासिक योगदान ठरते. उदाहरणार्थ, एखादी व्यक्ती जर १८ वर्षांचे वय असताना या योजनेत सहभागी झाली आणि त्याने दरमहा सुमारे २१० रुपये गुंतवले, तर त्याला निवृत्तीनंतर दरमहा पाच हजार रुपयांची पेन्शन मिळू शकते.
या पेन्शन योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया देखील खूप सोपी आहे. तुम्हाला फक्त तुमच्या जवळच्या बँकेत जाऊन अटल पेन्शन योजनेचा फॉर्म भरावा लागतो. अर्ज भरताना आधार कार्ड, बँक खाते क्रमांक आणि मोबाईल नंबर आवश्यक असतो. एकदा नोंदणी झाल्यानंतर निवडलेली रक्कम बँक खात्यातून दरमहा स्वयंचलित पद्धतीने कापून घेतली जाते. 60 वर्षे वय पूर्ण झाल्यानंतर पेन्शनची रक्कम दरमहा संबंधित व्यक्तीच्या खात्यात जमा होते. या योजनेत नॉमिनी नियुक्त करता येतो, त्यामुळे आकस्मिक मृत्यू झाल्यास लाभार्थ्याच्या कुटुंबीयांना याचा फायदा मिळतो.
सरकारकडून या योजनेला हमी मिळालेली असल्याने पेन्शन वेळेवर आणि खात्रीशीर स्वरूपात मिळते. शिवाय, आयकर कायद्याच्या कलम ८०सीसीडी अंतर्गत यामधील गुंतवणुकीवर करसवलत देखील मिळते. ही पेन्शन योजना (Pension Scheme) दीर्घकालीन असल्यामुळे आर्थिक नियोजन करताना शिस्तबद्धतेने प्रीमियम भरणे महत्त्वाचे आहे.
एकूणच अटल पेन्शन योजना ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी निवृत्तीनंतरच्या आयुष्यात आर्थिक आधार ठरू शकते. सरकारची हमी असलेली ही पेन्शन योजना भविष्यातील अनिश्चिततेपासून संरक्षण देणारा एक विश्वासार्ह पर्याय बनली आहे.
🔴 हेही वाचा 👉 एकदाच पैसे भरा, आणि वर्षभर संपूर्ण देशभर टोल फ्री प्रवास!.