Chandrashekhar Bawankule Denies Fund Transfer Ladki Bahin Scheme Maharashtra News : राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजने’साठी आदिवासी विकास विभागाचा निधी वळवला नसल्याचे स्पष्ट केले आहे. आदिवासी विकास विभागाचा निधी वळवण्यात आल्याच्या वृत्तांचा त्यांनी स्पष्टपणे इन्कार केला आहे. त्यांनी माध्यमांमध्ये आलेली ही माहिती “बिनबुडाची आणि दिशाभूल करणारी” असल्याचे म्हटले आहे.
शनिवारी नाशिकमध्ये जिल्हा महसूल अधिकाऱ्यांची बैठक घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना बावनकुळे म्हणाले, “प्रत्येक योजनांसाठी स्वतंत्र खर्चाच्या बाबी ठरलेल्या असतात. कोणताही विभाग दुसऱ्या विभागासाठी निधी वळवू शकत नाही – विशेषतः सामाजिक न्याय किंवा आदिवासी विभागातून इतरत्र निधी पाठवणे शक्यच नाही.”
लाडकी बहीण योजनेशी संबंधित निधी वादावर महायुतीतील काही मंत्र्यांनी (उदा. संजय शिरसाट) यापूर्वी अर्थ विभागावर टीका केली होती. त्यावर बोलताना बावनकुळे म्हणाले, “काही सदस्यांना चुकीची माहिती मिळाली होती. त्यांना योग्य माहिती दिल्यानंतर त्यांनी समजून घेतले आहे. त्यामुळे या वेळी त्यांच्याकडून कोणताही विरोध झालेला नाही.”
बावनकुळे यांनी माध्यमांमध्ये फिरणाऱ्या वृत्तांना “नाराज गटांमधील लोकांची अफवा” असे संबोधले. ते म्हणाले, “हेच ते लोक आहेत जे म्हणत होते की भाजप केंद्रात सत्तेत आल्यानंतर संविधान बदलणार. तस काही झाल का? जेव्हा हे लोक जनतेला सरकारविरोधात पटवून देऊ शकत नाहीत, तेव्हा अशा अफवा पसरवतात.”
दरम्यान, महसूल विभागाच्या बैठकीत बावनकुळे यांनी नवीन वाळू धोरण जाहीर केल्याचेही सांगितले. या धोरणांतर्गत प्रत्येक जिल्ह्यात ५० क्रशर उपलब्ध करून देण्यात येणार असून, त्यांना ठराविक भूखंड दिला जाईल जिथे उत्खनन करून दगड फोडणी करता येईल. ही जमीन नंतर जलसाठ्याच्या उपयोगासाठी वापरली जाणार आहे.
यावेळी बोलताना त्यांनी महायुती आगामी निवडणुका एकत्र लढवणार असल्याचही स्पष्ट केल आहे. “महापौर असो वा नगराध्यक्ष, सर्व पदे महायुतीकडेच असतील. आम्हाला ५१ टक्क्यांपेक्षा जास्त मत मिळण्याची शक्यता आहे,” अस ते म्हणाले.
🔴 हेही वाचा 👉 महाराष्ट्रात मान्सूनची झपाट्याने एन्ट्री; कोकण, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांना रेड अलर्ट तर काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस.