Dadasaheb Gaikwad Yojana Land Subsidy SC Farmers : महाराष्ट्रातील भूमिहीन अनुसूचित जाती आणि नवबौद्ध समाजातील शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. आता या घटकातील पात्र लाभार्थ्यांना सरकारकडून थेट १०० टक्के अनुदानावर शेतीसाठी जमीन उपलब्ध करून दिली जात आहे. ही सुविधा “कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना” या योजनेअंतर्गत दिली जात असून, यामुळे केवळ शेतजमिनीची मालकीच नव्हे, तर भूमिहीन शेतकऱ्यांना स्वाभिमानाने उभ राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत ही योजना सन 2004 पासून राबवली जात आहे. विशेषतः ग्रामीण भागातील दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांचे उत्पन्न वाढवणे, त्यांचे मजुरीवरचे अवलंबन कमी करणे आणि त्यांना स्वावलंबी बनवणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना कोरडवाहू (जिरायती) शेतीसाठी ४ एकर जमीन किंवा ओलीताखालील (बागायती) शेतीसाठी २ एकर जमीन विनामूल्य — म्हणजे १०० टक्के अनुदानावर दिली जाते.
जमिनीच्या वाढत्या किमती लक्षात घेता, शासनाने जिरायती जमिनीसाठी प्रती एकर ५ लाख रुपये आणि बागायती जमिनीसाठी प्रती एकर ८ लाख रुपयांपर्यंत खरेदी मर्यादा निश्चित केली आहे. मात्र, ही जमीन कसण्यायोग्य असावी, डोंगर उताराची, खडकाळ किंवा नदीपात्रालगतची क्षारयुक्त जमीन असू नये, असेही निकष या योजनेत स्पष्ट करण्यात आले आहेत.
या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या भूमिहीन शेतकऱ्यांनी अर्जासाठी आपल्या भागातील समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ज्या शेतजमीन मालकांना आपली जमीन विक्री करायची आहे, त्यांनीही विहित नमुन्यात अर्ज सादर करून ही संधी साधावी, असे आवाहन शासनाकडून करण्यात आले आहे.
अर्जासोबत ७/१२ उतारा, ८ अ उतारा, जमीन मूल्यमापन पत्रक यांसह संबंधित कागदपत्रे जोडणे बंधनकारक आहे. सुटीचे दिवस वगळता कार्यालयीन वेळेत हे अर्ज स्वीकारले जातील.
🔴 हेही वाचा 👉 या योजनेत दरमहा फक्त 210 रुपये गुंतवा आणि मिळवा महिन्याला 5000 रुपयांपर्यंत पेन्शन; असा करा अर्ज.