Mofat Pithachi Girni Yojana Maharashtra Fact Check : अलीकडे सोशल मीडियावर एक पोस्ट मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. त्यात दावा केला जात आहे की महाराष्ट्र सरकार अनुसूचित जाती आणि जमातीतील महिलांना मोफत पिठाची गिरणी देत आहे. या योजनेत 90 टक्के खर्च सरकारकडून दिला जातो आणि महिलांना फक्त 1,000 रुपये भरून पिठाची गिरणी मिळवता येते, असे या पोस्टमध्ये म्हटले आहे. महिलांना स्वावलंबी करण्यासाठी ही योजना राबवली जात असल्याचा दावाही करण्यात आला आहे.
ही माहिती अनेक व्हॉट्सॲप ग्रुप्स, फेसबुक पोस्ट्स आणि काही वेबसाईट्सवर झपाट्याने पसरत आहे. त्यामुळे अनेक महिलांमध्ये आणि कुटुंबांमध्ये या योजनेसंदर्भात उत्सुकता निर्माण झाली आहे. काही ठिकाणी तर गिरणीसाठी आवश्यक कागदपत्रांची यादीही दिली जात आहे. त्यामुळे ही योजना खरोखरच अस्तित्वात आहे का? आणि असल्यास, तिचा लाभ कसा घ्यायचा?
मात्र सत्य काय आहे?
SarkariBatmya.com ने या योजनेसंदर्भात सखोल माहिती घेतली असता, आश्चर्याची गोष्ट म्हणजे महाराष्ट्र सरकारच्या कोणत्याही अधिकृत संकेतस्थळावर किंवा समाजकल्याण विभागाच्या कागदपत्रांमध्ये अशा प्रकारच्या कोणत्याही योजनेचा उल्लेख आढळलेला नाही. म्हणजेच ही योजना प्रत्यक्षात अस्तित्वात नाही.
सरकारी योजना जाहीर झाल्यावर त्या अधिकृत शासन निर्णयाद्वारे प्रसिद्ध केल्या जातात आणि त्या संबंधित खात्याच्या संकेतस्थळावर तपशीलासह उपलब्ध असतात. मात्र, ‘मोफत पिठाची गिरणी योजना’ असा कोणताही शासकीय निर्णय सध्या उपलब्ध नाही.
फसवणुकीपासून सावध राहा
अनेक वेळा अशा अफवा पसरवल्या जातात आणि त्याचा वापर करून काहीजण लोकांकडून अर्जासाठी शुल्क घेतात, बनावट फॉर्म भरायला लावतात आणि आर्थिक फसवणूक करतात. त्यामुळे नागरिकांनी अशा कोणत्याही माहितीवर विश्वास ठेवण्याआधी तिची खातरजमा करणे अत्यंत आवश्यक आहे.
जर सरकार अशा कोणतीही योजना जाहीर करत असेल, तर ती https://www.maharashtra.gov.in/, https://mahades.maharashtra.gov.in/ किंवा संबंधित खात्याच्या संकेतस्थळावर अधिकृतपणे प्रसिद्ध होते.
निष्कर्ष
‘मोफत पिठाची गिरणी’ या नावाने व्हायरल होत असलेली योजना केवळ अफवा आहे. नागरिकांनी सावध राहावे आणि अधिकृत माहितीशिवाय कुठल्याही योजनेवर विश्वास ठेवू नये.
🔴 हेही वाचा 👉 जुन्या पॅनला PAN 2.0 मध्ये अपग्रेड करण्याची सोपी प्रक्रिया जाणून घ्या.