Post Office Schemes Safe Investment 2025 : पोस्ट ऑफिसच्या गुंतवणुकीसाठी असलेल्या योजना सध्या देशभरात गुंतवणूकदारांसाठी एक विश्वासार्ह आणि हमीदार पर्याय ठरत आहेत. बँकांप्रमाणेच पोस्ट ऑफिस देखील विविध प्रकारच्या बचत योजनांद्वारे नागरिकांना चांगल्या व्याजदरासह सुरक्षित आर्थिक स्थैर्य देण्याचे काम करत आहे. बाजारातील चढ-उतारांपासून दूर, हे पर्याय विशेषतः त्यांच्यासाठी उपयुक्त आहेत, जे कोणतीही जोखीम न पत्करता आपली गुंतवणूक सुरक्षित ठेवू इच्छितात.
निवृत्त नागरिकांसाठी सुरु करण्यात आलेल्या ‘जेष्ठ नागरिक बचत योजने’ला सध्या मोठ्या प्रमाणावर पसंती मिळत आहे. या योजनेत सध्या 8.2 टक्के इतका आकर्षक व्याजदर मिळत असून, पाच वर्षांपर्यंत गुंतवणूक करता येते. सिंगल किंवा संयुक्त दोन्ही स्वरूपात खाती उघडण्याची सुविधा असून, या योजनेत 30 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक शक्य आहे. पाच वर्षांनंतर ही योजना पुढील तीन वर्षांसाठी वाढवता येते.
दुसरी महत्त्वाची योजना म्हणजे पोस्ट ऑफिसची मासिक उत्पन्न योजना. ही योजना त्यांच्यासाठी उपयुक्त आहे, जे नियमित मासिक उत्पन्न मिळवू इच्छितात. सध्या या योजनेत 7.4 टक्के व्याज दिले जात असून, सिंगल खात्यासाठी 9 लाख आणि संयुक्त खात्यासाठी 15 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते. या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे मासिक व्याज थेट खात्यात जमा होत असल्यामुळे वयोवृद्ध किंवा गृहिणींसाठी हे उत्पन्नाचे स्थिर मांध्यम ठरू शकते.
तसेच, दीर्घकालीन गुंतवणुकीचा विचार करणाऱ्यांसाठी ‘किसान विकास पत्र’ योजना एक प्रभावी पर्याय आहे. या योजनेत 7.5 टक्के व्याजदर असून, गुंतवलेली रक्कम 115 महिन्यांत दुप्पट होते. ही योजना देखील सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय मानली जाते आणि शहरांसोबत ग्रामीण भागातील नागरिकही यामध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करत आहेत.
या सर्व योजनांमधील एकसंध वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये कोणतीही जोखीम नाही. सरकारी हमी असल्यामुळे, गुंतवणूकदारांना व्याज दर आणि गुंतवलेली रक्कम सुरक्षित राहण्याची खात्री असते. आर्थिक सुरक्षिततेचा विचार करत असताना किंवा निवृत्तीनंतरच्या काळासाठी निधी जमा करताना पोस्ट ऑफिसच्या या योजना अनेकांसाठी उपयुक्त ठरत आहेत. या योजनांचा लाभ घेऊन अनेक नागरिक आपले भविष्य अधिक स्थिर आणि सुरक्षित करत आहेत.
हेही वाचा : पंतप्रधान आवास योजनेच्या सर्वेक्षणाला मुदतवाढ; उत्पन्न मर्यादेतही मोठा बदल.