इयत्ता 11वी प्रवेश नोंदणीसाठी या तारखेपर्यंत मुदतवाढ; नोंदणीसंबंधी अडचणींसाठी या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधा FYJC Admission 2025 Deadline Extended

2 Min Read
FYJC Admission 2025 Deadline Extended Maharashtra

FYJC Admission 2025 Deadline Extended Maharashtra : इयत्ता 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थी नोंदणीची अंतिम मुदत शालेय शिक्षण विभागाने वाढवली असून आता इच्छुक विद्यार्थ्यांना 5 जून 2025 रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत नोंदणी करता येणार आहे. यापूर्वी ही अंतिम तारीख 3 जून 2025 होती.

शालेय शिक्षण विभागाचे प्र. शिक्षण संचालक डॉ. श्रीराम पानझाडे यांनी यासंदर्भातील माहिती दिली. त्यांनी स्पष्ट केलं की, 6 मे 2025 रोजीच्या शासन निर्णयात काही सुधारणा करण्यात आल्या असून, 31 मे 2025 रोजीच्या पत्राद्वारे इन-हाऊस कोट्याच्या जागा भरण्याच्या नियमांमध्ये आवश्यक बदल करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना व कनिष्ठ महाविद्यालयांना नोंदणीसाठी अधिक वेळ मिळावा, यासाठी ही मुदतवाढ देण्यात आली आहे.

या सुधारित निर्णयानुसार, खासगी व्यवस्थापनाच्या कनिष्ठ महाविद्यालयांना 10 टक्के जागा इन-हाऊस कोट्यासाठी आरक्षित ठेवण्यात येणार आहेत. मुंबई, उपनगर आणि ठाणे क्षेत्रासाठी एकच युनिट ग्राह्य धरले जाईल, तर इतर जिल्ह्यांमध्ये महसूली जिल्हानिहाय युनिटची अंमलबजावणी होईल.

सद्यस्थितीत 2 जून 2025 रोजी सायंकाळपर्यंत राज्यभरातून 10 लाख 85 हजार 851 विद्यार्थ्यांनी यशस्वी नोंदणी केली आहे. त्यात मुंबई विभागातून सर्वाधिक 2,65,900 नोंदण्या, तर पुणे विभागातून 1,87,925 विद्यार्थी नोंदणी झाली आहे.

विद्यार्थ्यांनी नोंदणीसाठी mahafyjcadmissions.in या अधिकृत संकेतस्थळावर लवकरात लवकर अर्ज करावा, असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे. यानंतरचे प्रवेशाचे वेळापत्रक पूर्वी जाहीर केल्याप्रमाणेच राहणार आहे. नोंदणीसंबंधी अडचणींसाठी support@mahafyjcadmissions.in या ईमेलवर किंवा 8530955564 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधता येईल.

हेही वाचा : क्रेडिट स्कोअर 500 असूनही मिळू शकत होम लोन? जाणून घ्या संपूर्ण माहिती.

Share This Article