महाराष्ट्रात यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस; मात्र काही जिल्ह्यांमध्ये खंडाची शक्यता Maharashtra Monsoon Rain Forecast 2025

2 Min Read
Maharashtra Monsoon Rain Forecast 2025 Farmers Advisory

मुंबई | ३ जून २०२५: Maharashtra Monsoon Rain Forecast 2025 Farmers Advisory – यंदा महाराष्ट्रात मान्सून सरासरीच्या तुलनेत अधिक सक्रिय राहणार असून राज्यात सरासरीच्या १०६ टक्के पावसाचा अंदाज हवामानतज्ज्ञांनी वर्तवला आहे. पावसाचा जोर मुख्यत्वेकरून पश्चिम महाराष्ट्र, विशेषतः पुणे विभागात अधिक राहणार असून, या भागात ११५ टक्क्यांपर्यंत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

ज्येष्ठ कृषी हवामानतज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, जुलै महिन्यात बहुतांश भागांत मुसळधार पाऊस होईल. मात्र, जून आणि जुलै महिन्यांत काही जिल्ह्यांत पावसाचा खंड जाणवू शकतो. धुळे, राहुरी, परभणी, निफाड, अकोला, पाडेगाव आणि कोल्हापूर हे भाग खंडाच्या झोनमध्ये येण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे, दापोली, पुणे, नागपूर, सोलापूर, जळगाव, कराड या भागांमध्ये पावसातील खंड अल्पकाळासाठी असेल, अशी शक्यता आहे.

डॉ. साबळे यांनी हवामानातील अनियमिततेचा इशारा देत शेतकऱ्यांना पीक पेरणीच्या पद्धतीत आवश्यक ते बदल करण्याचे आवाहन केले आहे. “पावसाचे प्रमाण काही भागांत जास्त, तर काही ठिकाणी अत्यल्प राहील. त्यामुळे, पावसावर अवलंबून असलेल्या पारंपरिक पद्धतींमध्ये बदल करणे अत्यंत गरजेचे आहे,” असे त्यांनी सांगितले.

मुंबई आणि उपनगरांमध्ये आज हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असून, आकाश अंशतः ढगाळ राहील. हवामान खात्याने मोठ्या भरतीचा इशाराही दिला आहे.

राज्यात यंदा सुरुवातीपासूनच मे महिन्यात जोरदार मान्सूनपूर्व पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे खरीप हंगामासाठी जमीन तयार करत असलेल्या शेतकऱ्यांच्या दृष्टीने हा अंदाज महत्वाचा मानला जात आहे.

हेही वाचा : नमो शेतकरी सन्मान योजनेच्या हप्त्यात वाढ? ९३ लाख शेतकऱ्यांचे ९ हजार प्रलंबित.

Share This Article