Atal Pension Yojana Monthly Benefit Details : देशातील असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी केंद्र सरकारकडून चालवली जाणारी अटल पेन्शन योजना (Atal Pension Yojana) ही एक महत्त्वाची निवृत्तीवेतन योजना आहे. वृद्धापकाळात आर्थिक सुरक्षितता मिळावी या हेतूने ही योजना सुरू करण्यात आली असून, या योजनेअंतर्गत वयाच्या ६० वर्षांनंतर दरमहा एक हजार ते पाच हजार रुपयांपर्यंत पेन्शन मिळवण्याचा पर्याय खुला होतो.
अटल पेन्शन योजना विशेषतः अशा लोकांसाठी आहे, ज्यांना दरमहा नियमित पगार मिळत नाही, परंतु ते भविष्याचा विचार करून दरमहा थोडी गुंतवणूक करू इच्छितात. १८ ते ४० वयोगटातील कोणताही भारतीय नागरिक अटल पेन्शन योजनेमध्ये सहभागी होऊ शकतो.
योजनेची मुख्य वैशिष्ट्ये
या योजनेत सहभागी झालेल्या व्यक्तीला किमान २० वर्षांपर्यंत नियमित मासिक प्रीमियम भरावा लागतो. यानंतर ६० वर्षे पूर्ण झाल्यावर निवडलेल्या प्लॅननुसार दरमहा पेन्शन मिळू लागते. पेन्शनची रक्कम १,०००, २,०००, ३,०००, ४,००० आणि ५,००० रुपये अशी निवडता येते.
उदाहरणार्थ, जर एखाद्या व्यक्तीने १८ वर्षाच्या वयात या योजनेत गुंतवणूक सुरु केली आणि जर त्याने ५,००० रुपये मासिक पेन्शनचा प्लॅन निवडतो, तर त्याला दरमहा फक्त २१० रुपये प्रीमियम भरावा लागतो. आणि या योगदानावर आयकर अधिनियमाच्या ८०CCD अंतर्गत कर सवलत मिळते.
नोंदणी प्रक्रिया
अटल पेन्शन योजनेत सहभागी होण्यासाठी नागरिकांना त्यांच्या जवळच्या बँकेत जाऊन खाते उघडावे लागते. खाते उघडताना आधार कार्ड, मोबाईल नंबर, व निवडलेल्या पेन्शन प्लॅनची माहिती द्यावी लागते. बँक दरमहा ठरलेली प्रीमियम रक्कम खात्यातून कापून घेते, आणि ६० वर्षांनंतर त्याच खात्यावर पेन्शन जमा होते.
अटल पेन्शन योजनेत कोण सहभागी होऊ शकतात?
वय १८ ते ४० दरम्यान असलेले भारतीय नागरिक.
बँकेत बचत खाते असणे आवश्यक.
इतर कोणत्याही सरकारी पेन्शन योजनेचा लाभ न घेणारे.
ज्यांना वृद्धापकाळात नियमित उत्पन्नाची गरज आहे, आणि जे अल्प उत्पन्नातून सुरक्षित गुंतवणूक शोधत आहेत, त्यांच्यासाठी अटल पेन्शन योजना एक चांगला पर्याय ठरु शकते. सरकारी हमी, कर सवलत, आणि निश्चित पेन्शन मिळण्याची हमी यामुळे ही योजना देशातील लाखो नागरिकांसाठी जीवनात आर्थिक स्थैर्य निर्माण करणारी बनली आहे.
हेही वाचा : 2025 मधील पोस्ट ऑफिसच्या सर्वात फायदेशीर योजना, हमीदार पर्याय; सुरक्षित परतावा.