Ladki Bahin Yojana Namo Shetkari Yojana Fraud News : महाराष्ट्र सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना’ आणि ‘नमो शेतकरी सन्मान योजने’मध्ये मोठा गैरव्यवहार उघडकीस आला आहे. तब्बल 9 लाख महिलांनी बेकायदेशीररित्या या सरकारी योजनांचा लाभ घेतल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे. यामध्ये राज्यातील जवळपास अडीच हजार सरकारी महिला कर्मचारी लाभार्थी असल्याचेही निष्पन्न झाले आहे. विशेष म्हणजे, वर्ग 3 आणि वर्ग 4 मध्ये कार्यरत असलेल्या अनेक महिलांनी अपात्र असूनही या योजनांमधून थेट निधी घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.
महिला व बालविकास विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सहा लाखांहून अधिक महिलांची तपासणी अद्याप बाकी आहे. त्यात अजून मोठा गैरव्यवहार समोर येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, काही लाभार्थींनी एकाच वेळी ‘लाडकी बहिण योजना’ आणि ‘नमो शेतकरी सन्मान योजना’ या दोन्ही योजनांचा लाभ घेतला आहे, हेही तपासात स्पष्ट झाले आहे.
राज्य शासनाच्या नियमांनुसार शासकीय सेवकांना सरकारी योजनांचा लाभ घेता येत नाही. मात्र, तरीही अनेक महिला कर्मचारी अनधिकृतरित्या निधी उचलताना आढळल्या आहेत. यामुळे आता प्रशासनाने लाभार्थ्यांवर बारकाईने लक्ष ठेवायला सुरुवात केली आहे. दोषी आढळणाऱ्यांवर कडक कारवाई होणार असल्याच संकेत प्रशासनाने दिले आहेत.
दरम्यान, ‘लाडकी बहिण योजने’अंतर्गत मे महिन्याचा हप्ता लवकरच पात्र महिलांच्या खात्यात जमा केला जाणार आहे, अशी माहिती महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी दिली आहे. या योजनेबाबत अनेक अफवा पसरवल्या जात असल्या तरीही ही योजना बंद होणार नसून, पात्र महिलांना नियमितपणे लाभ मिळत राहणार आहे, असही त्यांनी स्पष्ट केल आहे.
हेही वाचा : दर महिन्याला फक्त ₹5,825 गुंतवून मिळवा १० लाख रुपये, SBI ने व्याजदरांमध्ये केले महत्त्वाचे बदल.