Edible Oil Prices Cut Custom Duty India 2025 : देशात वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सर्वसामान्य ग्राहकांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. रोजच्या स्वयंपाकासाठी आवश्यक असलेल्या खाद्यतेलाच्या दरात घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे केंद्र सरकारने कच्च्या खाद्यतेलावरील बेसिक कस्टम ड्युटी (Basic Customs Duty) कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.
बेसिक कस्टम ड्युटीत मोठी कपात
आतापर्यंत खाद्यतेलावर २० टक्के बेसिक कस्टम ड्युटी आकारली जात होती. मात्र आता ती फक्त १० टक्क्यांवर आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे आयात शुल्कात ८.७५ टक्क्यांवरून १९.२५ टक्क्यांपर्यंतचा फरक निर्माण झाला आहे. या निर्णयामुळे खाद्यतेल उद्योगाला स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत की, या कपातीचा पूर्ण लाभ ग्राहकांपर्यंत पोहोचावा.
सरकारचा विश्वास — ग्राहक व शेतकऱ्यांना फायदा
अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एका उच्चस्तरीय बैठकीनंतर हा निर्णय जाहीर करण्यात आला. सरकारने स्पष्टपणे सांगितले की, शुल्क कपातीमुळे खाद्यतेलाचे दर जवळपास १० टक्क्यांनी घटू शकतात. त्यामुळे ग्राहकांना थेट दिलासा मिळेल आणि महागाईला लगाम बसेल, असा सरकारचा विश्वास आहे.
देशांतर्गत उद्योग व शेती क्षेत्राला बळकटी
सरकारने हेही सांगितले की, शुल्क रचनेतील बदलामुळे देशांतर्गत शुद्धीकरण उद्योगाला चालना मिळेल. विशेषतः खाद्यतेलाची आयात वाढेल आणि स्थानिक प्रक्रियेस प्रोत्साहन मिळेल. यामुळे शेतकऱ्यांनाही योग्य मोबदला मिळण्यास मदत होईल. सरकारच्या मते, खाद्यतेलाच्या किंमतींवर प्रभाव टाकणाऱ्या मुख्य घटकांपैकी सीमाशुल्क हा एक महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे आयात शुल्कात केलेल्या या कपातीनंतर देशात खाद्यतेलाचे दर कमी होतील आणि गृहिणींसाठी हा मोठा दिलासा ठरेल.
हेही वाचा : महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा रेड, ऑरेंज व येलो अलर्ट जारी.