Maharashtra Heavy Rain Red Alert 15 June 2025 : महाराष्ट्रात थोडक्याच विश्रांतीनंतर मान्सूनने पुन्हा जोर धरला आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भागांमध्ये पावसाचा जोर वाढला असून, हवामान खात्याने रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना रेड अलर्ट, तर मुंबईसह इतर भागांना यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
कोकणात ढगफुटीसदृश्य पावसाची शक्यता
कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत रविवारी आणि सोमवारी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. रायगड जिल्ह्यातही आजच्या दिवशी रेड अलर्ट जाहीर करण्यात आला असून, महाड, माणगाव, पोलादपूर आणि अलिबाग परिसरात सतत पावसाची रिपरिप सुरू आहे. समुद्र खवळलेला असून मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
विजांच्या कडकडाटासह पावसाचा कहर; 9 जणांचा मृत्यू
राज्यात शनिवारी विजांमुळे 9 जणांचा मृत्यू झाला आहे. विशेषतः छत्रपती संभाजीनगर, परभणी, धुळे, अमरावती आणि जळगाव जिल्ह्यांतील घटना गंभीर आहेत. विजेमुळे अनेकजण भाजले असून काहींवर उपचार सुरू आहेत. हवामान विभागाने विजेपासून बचावासाठी उघड्या जागेत न थांबण्याचा इशारा दिला आहे.
पश्चिम महाराष्ट्रात मध्यम ते जोरदार पाऊस
सातारा, पुणे, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यांत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडत असून, सोलापूरहून सातारा आणि कोल्हापूर दिशेने पावसाचे प्रमाण अधिक राहील. नदीकिनाऱ्यावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
मराठवाडा आणि विदर्भातही हवामान अस्थिर
मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, नांदेड आणि लातूर जिल्ह्यांमध्ये विजांसह पावसाची शक्यता वर्तवली आहे. विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली आणि नागपूर परिसरात वादळी वाऱ्यांसह पावसाचा जोर असून, नदीकाठी पूरजन्य परिस्थिती निर्माण होण्याचा धोका आहे.
हेही वाचा : महिन्याला फक्त 210 रुपये भरून मिळवा आयुष्यभर 5000 रुपये पेन्शन, जाणून घ्या सर्व फायदे.