Ladki Bahin Yojana Tax Paying Women Benefits Review : महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या महिलांच्या पात्रतेची नव्याने पडताळणी होणार आहे. या योजनेचा उद्देश आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना आर्थिक मदत देणे असला तरी, काही आर्थिकदृष्ट्या सक्षम महिलांनी देखील या योजनेचा लाभ घेतल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे सरकारने आता कर भरणाऱ्या महिलांना योजनेच्या लाभातून वगळण्यासाठी ही पडताळणी सुरु केली आहे.
महिला कर्मचाऱ्यांनी घेतला लाभ
अलीकडेच करण्यात आलेल्या प्राथमिक तपासणीत राज्यातील सुमारे 2,000 पेक्षा अधिक महिला सरकारी कर्मचारी या योजनेचा लाभ घेत असल्याचे समोर आले. या महिलांपैकी बहुतेक महिला आयकर भरणाऱ्या असल्याने त्या या योजनेसाठी पात्र नाहीत, असा सरकारचा दावा आहे. यामुळे आता राज्य सरकारने राज्य व जिल्हास्तरावर आयकर विवरणपत्रांची पडताळणी करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
केंद्र सरकारकडून आयकर माहिती शेअर करण्यास परवानगी
या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारकडे आयकर भरणाऱ्या महिलांची माहिती वापरण्यासाठी परवानगी मागितली होती. 3 जून 2025 रोजी केंद्रीय अर्थ मंत्रालयाने ही परवानगी देत महाराष्ट्र महिला व बालविकास विभागाच्या सचिवांना ही माहिती वापरण्याची अधिकृत मुभा दिली आहे.
निवडणुकीपूर्वी सुरू झालेली योजना
लाडकी बहिण योजना ही महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जुलै ते सप्टेंबर 2024 दरम्यान सुरु केली होती. सरकारने आता पुन्हा सत्तेत आल्यानंतर लाभार्थ्यांची पात्रता काटेकोरपणे तपासण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत आर्थिकदृष्ट्या सक्षम महिलांना लाभातून वगळण्यात येत आहे.
इतर योजनांमधूनही लाभार्थी वगळले गेले
मार्च 2025 मध्ये संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजना या योजनांमधून देखील अपात्र लाभार्थ्यांना वगळण्यात आले होते. त्याच धर्तीवर लाडकी बहिण योजनेसाठी पात्रतेचे पुनरमूल्यांकन सुरू करण्यात आले आहे.
हेही वाचा : EPFO ATM सुविधा लवकरच सुरू; PF पैसे काढा आता थेट एटीएममधून.